पत्रोत्तर (संदीप खरे}

मला काही रसिक कधी कधी उत्सुकतेनं विचारतात : "तुम्ही कुठल्या वेळात कविता लिहिता?'
बाप रे! हा म्हणजे "तुमची शिंक द्यायची वेळ कोणती?', "तुमच्या हसण्याचं टायमिंग काय असतं?', "किती ते किती साधारण तुम्ही रडता किंवा वाईट वाटून घेता?' या धर्तीचाच प्रश्‍न! याचं उत्तर मी बापडा काय देणार?! एका पक्ष्याच्या हृदयात पारध्यानं मारलेला बाण शिरला आणि ते पाहणाऱ्या वाल्मीकींद्वारे जगातली पहिली कविता अवतरली असं म्हणतात. कविता का सुचते, कशी सुचते, कधी सुचते हे सांगणार तरी कसं! किंवा कवितेच्या नुकतेच प्रेमात पडलेले काही नवकवी मला विचारतात ः "कुठल्या विषयावर कविता लिहू? कवितेला काही विषय सांगा ना!' प्रेम, प्रेमभंग, आई, सामाजिक विषमता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हुंडाबळी, स्त्रियांवरचे अन्याय, आतंकवाद हे आणि यांसारखे विषय त्यांचे "झालेले' असतात. आता या प्रश्‍नाचं उत्तर तरी काय देणार? सगळं विश्‍वच या कवितेच्या कवेत सामावलेलं, अमुक एक विषयावर कविता करा असं कसं सांगणार? समर्थांच्या शब्दांचा संदर्भ थोडासा बदलून म्हणायचं तर "अणुपासोनि ब्रह्मांडाएवढी होत जातसे' अशा या कवितेपासून जगात अस्पर्श्‍य असं उरणार तरी काय?

द. भा. धामणस्करांची ही कविता वाचली आणि पुन्हा एकदा याचं प्रत्यंतर आलं! अतिशय संवेदनशील, हळवी आणि वेगळं बोलणारी धामणस्करांची एकूणच कविता! एखाद्या कथेचा किंवा कादंबरीचा अनुभव देणारी ही "पत्रोत्तर' कविता आपल्या साऱ्यांच्याच जवळची...पालक आणि पाल्य यांच्यातल्या रेशीमबंधांची...दुराव्याची! वाचताना मला जशी, जेवढी जाणवली, ते सांगायचं आहे.

"नसतेस घरी तू जेव्हा' या कवितेचा खूप वेगळा संदर्भ जपणारा एक तरुण रसिक मला म्हणाला ः "वर्षभरापूर्वी आम्ही पळून जाऊन लग्न केलं. दोन्ही घरं आम्हाला कायमस्वरूपी बंद झाली आणि आठ महिन्यांतच माझी बायको कॅन्सरनं गेली. आता मी एकटाच असतो आणि सोबतीला तुमची ही कविता!' त्यानंतर बराच वेळ सुन्न होऊन बसलो होतो. या कवितेच्या निमित्तानं त्या प्रसंगाचीही आठवण झाली.

अंगा-खांद्यावर वाढलेला, मोठा झालेला पोटचा गोळा! त्याच्या पालनात, त्याच्याभोवती आई-बाबांचं विश्‍व सारं एकवटून आलेलं. कुठल्या क्षणांच्या सावलीत अशी अचानक भिंत उभी राहते दोघांच्यात?!

सभोवताली अशा अनेक केसेस दिसतात. दुपटी बदलत होतो ते पोरगं किंवा पोरगी...ऑफिसमधून घरी आल्यावर दुडूदुडू धावत येऊन गळ्यात पडणारी लेक, रात्र रात्र मांडीवर घेऊन काढलेली आजारपणं, खाणं, अभ्यास, टीव्ही, सिनेमा, खेळ...सगळ्यासगळ्यांत आई किंवा बाबा हवाच, असा हट्ट धरणारी लेक, काही वर्षांनी एक दिवस समोर उभी राहून शांतपणे सांगू लागते ः "बाबा, अमुक अमुक एक जण आहे. आमच्या आवडी-निवडी, मतं खूप जुळतायत आणि आम्ही लग्न करायचं ठरवलंय!!'' कसं होत असेल त्या क्षणी? आत्ताआत्तापर्यंत आपल्या खांद्यावर बसलेलं हे छोटं पाखरू अचानक उडून चाललं भुर्रकन्‌? कसली मतं आणि कसल्या आवडी-निवडी? काय जग पाहिलंय हिनं? काळजी, भीती, अहंकाराला लागलेला हलकासा धक्का, माया, दुराव्याचं भय...काय काय दाटून येत असेल एका क्षणात? मग कधी होकार...कधी नकार...आणि मग त्यातून कधी कधी अगदी टोकाला गेलेल्या गोष्टी!
18 वर्षे पूर्ण झाली म्हणून अचानक इतकी "मेजर', इतकी "स्वतंत्र' होते मुलगी? इतकी की, एका निर्णयासाठी आत्तापर्यंत ते तिचं जग होतं, ते एका क्षणात विसरून दृष्टीआड होऊन जावी? मग मनाचे दरवाजे बंद होऊन जातात, क्वचितप्रसंगी घराचेही! एक सुन्न रिकामपण घेऊन आई-बाबा स्तब्ध होतात. दोघांच्या डोळ्यांतल्या प्रश्‍नांची उत्तरं दोघांकडंही नसतात.

तारुण्याच्या धुंदीत, मस्तीत झेपावलेलं पाखरू...त्याला कधी खरंच त्याचं आभाळ भेटतं आणि कधीतरी मात्र वाऱ्याच्या थपडा, विजांचे चाबूक पंखांना झेपत नाहीत. घायाळ होऊन ते जमिनीवर येतं; पण घरट्याचे दरवाजे बंद झालेले असतात; कधी तिनं स्वतःहूनच ते केलेले असतात! पाखरू हरवून जातं...कधीतरी तर (दर काही दिवसांआड आपण पेपरमध्ये वाचतो, तसं) स्वतःच्या इच्छेनंच स्वतःचे श्‍वास मिटवून टाकतं!

आई-बाबांवर तर आभाळ कोसळलेलंच असतं. अगदी ती घरातून गेल्यापासून. बरेचदा तर इष्टमित्रांकडून हेच सल्ले मिळतात ः "कुठं जाणारे? आठ दिवस गेले की येईल अक्कल...तुम्ही बरीक आता चांगलं खंबीर राहा!' आणि आई-बाबा बिचारे कुठंतरी मुळातच खचलेलं खंबीरपण सांभाळून ते "आठ दिवस' जाण्याची वाट पाहत राहतात. जणू मुलीचं चुकलं, हे तिला कळणं हेच महत्त्वाचं! "आम्हाला न विचारता निर्णय? मग भोग आता!' हेच जणू काही समाधान!

या पार्श्‍वभूमीवर शेवटच्या उताऱ्यात जगण्याचं सारं शहाणपण किती सुरेख बोलतं पाहा! मुलाच्या अती टाईट जिन्सवर नाक मुरडताना आपणही कधीतरी आपल्या वडिलांच्या शेऱ्याकडं दुर्लक्ष करून "बेलबॉटम' शिवली होती, हे सुवचणारं शहाणपण! आपल्या निर्णयाला विरोध म्हणजेच तिच्या स्वतंत्र निर्णयशक्तीचा प्रारंभ या विचारानं सुखावणारं शहाणपण! आपल्या मतानुसार वागणं किंवा न वागणं याच्यापलीकडं "जीव लावणं' हे शब्द उभे राहतात. आपल्या "जीवलगा'साठी त्याच्या सुखात, दुःखात, संकटातही मनाचे, घराचे दरवाजे सताड उघडे ठेवतात!

कसला कणखरपणा? कसला अभिमान? कसला राग? पिल्लू "आपलं' म्हटल्यावर या शब्दांच्या संभावना राहतात तरी कुठं? नव्या नव्हाळीचा उतावीळपणा, बंडखोरी आणि हट्ट जर आपणही धरून बसलो तर त्यांच्या आणि आपल्या वयात, जाणिवेत अंतर तरी किती?

हेमंत जोगळेकरांच्या कवितेत एकदा ओळ वाचली होती ः "शेवटी प्रत्येकाची वाट जाते प्रत्येकाचा पायाखालून!' प्रत्येक पावलाची वाट वेगळी आणि ठसासुद्धा! फूल उमलावं तसा आपल्या लहानग्याचा निर्णयही एक दिवस उमलून आला तर खरं म्हणजे आई-बाबा म्हणून ती गोष्ट हृदयापासून आनंदून जावं अशीच की! मग हा निर्णय स्वतःच्या जीवनसोबत्याचा असो, शैक्षणिक कोर्सचा असो, करिअरचा असो वा घराचा असो! मूळचा झराच जिव्हाळ्याचा असेल तर नात्यात कोरडेपणा यावा तरी कशानं!

अनिल अवचटांनी त्यांच्या मुलींवर लिहिलेल्या एका लेखाच्या शेवटी म्हटलं होतं :"चला...मुली मोठ्या झाल्या...म्हणजे आपण आता पुन्हा लहान व्हायला हरकत नाही!'

धामणस्करांची ही कविता प्रथम वाचली, तेव्हा शेवटच्या ओळीपाशी डोळे भरून आले होते...अगदी आत्ता या लेखाची शेवटची ओळ लिहिताना येतायत्‌ तसेच; आणि योगायोग म्हणजे माझी चौथीतली लेक समोर "जेम्स'च्या गोळ्या धरून मला विचारते आहे ः "बाबा, यातली कुठली गोळी आधी खाऊ? लाल की हिरवी...?'
.............................
पत्रोत्तर

आम्हांला अवमानित वाटणार नाही, अशी
प्रारंभीच आशा व्यक्त करून ते लिहितात ः
आपण उभयता फारच मृदू आहांत.
या प्रसंगी आपला हा म्हणतो त्याप्रमाणे
आपण मुद्दाम कणखर झाले पाहिजे...
थोडक्‍यात म्हणजे कुठल्या एका
स्वयंनिर्णयाचे क्षणी आमच्या लेकरानं
आमचा सल्ला मानला नाही म्हणून तिला
घराचे दरवाजे कायमचे बंद करायचे, तिच्या
आर्त टाहोंकडे दुर्लक्ष करीत
आपल्या नाराजीचे पाते सतत
तिच्या काळजास लावून ठेवायचे, आणि
तिला चांगला पश्‍चात्ताप होईल अशी व्यवस्था करून
तिच्या संपूर्ण शरणागतीची वाट पाहत आपण
आपल्या जागी मजेत सुप्रतिष्ठित असायचे...

सल्ल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानीत त्यांना
तूर्त कळवायचे एवढेच की,
आता आम्हांस काहीच (कणखर वगैरे) "होणे' नाही.
आता फक्त "असणे'. एकाच वेळी
कोलमडणे भन्नाट आपले
संचित शहाणपण असे व्यर्थ ठरताना,
आनंदणेही आतून लेकरू असे
संपूर्ण स्वतंत्र होताना - आपण
अधिकाधिक अनावश्‍यक होत जाताना...
- द. भा. धामणस्कर

("बरेच काही उगवून आलेले' या काव्यसंग्रहातून)