अस्मिता (संदीप खरे)

शब्दांना वेळीच सावरले म्हणून बरे झाले
नाहीतर शब्द भलतेच बोलून गेले असते.
शब्दांना माघारी बोलावले म्हणून बरे झाले
नाहीतर शब्द छेद करून पार गेले असते
शब्द तरुण... बंदुकीतल्या दारूसारखे ज्वालाग्राही
अस्मितेच्या खाली पोट असते, हे त्यांना माहीत नाही.
- दत्ता हलसगीकर ("आषाढघन' काव्यसंग्रहातून)

शब्द, शब्द आणि शब्द.... जन्मापासून अवतीभवती उमटणारे शब्द... जन्माच्या अंतापर्यंत गिरगिरणारे, भिरभिरणारे शब्द! पावसासारखे शब्द, चांदण्यासारखे शब्द, फुलांसारखे शब्द, निखाऱ्यांसारखे शब्द, ज्वालामुखीसारखे शब्द! जग बेचिराख करणारी युद्धं मांडणारे शब्द, रणांगणावर तत्त्वज्ञानाची कैलासशिखरे होणारे शब्द! ऐकावत असे शब्द, कानावरसुद्धा नकोत, असे शब्द! अतिपरिचयाने मोल हरवलेले शब्द!

कितीजणांनी किती प्रकारे गौरविलेले शब्द! तुकोबा म्हणतात - आम्हा घरी धन । शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे। यत्नें करू।।
दत्ताजींची कविता सुरवातीला बोलते आहे ती शस्त्र होऊ पाहणाऱ्या या शब्दांविषयीच! त्यांना जाणवली आहे शब्दांची असीम दाहकता, त्यांचा स्फोटकपणा, विखार, कापत-जाळत जाण्याची त्यांची ताकद!

बेचिराख जर्मनीला अभिमानानं उभं करून साऱ्या जगाला वेठीला धरणाऱ्या हिटलरनं वापरले ते हेच शब्द- आणि बॉंबहल्ल्यात सारं लंडन उद्‌ध्वस्त होत असताना ब्रिटिशांना निर्धारानं उभं ठेवणाऱ्या चर्चिलनं वापरले ते हे शब्दच!

आणि इतकं लांब कशाला- अगदी रोजच्या जगण्यातही आपण पाहतोच की! सुरेश भट म्हणतात तसं, एका शब्दासाठी आयुष्य तारण ठेवणाऱ्या जुन्या मातीच्या माणसांविषयी आपण ऐकलं असेल. कुठल्याही दडपशाहीला न जुमानता ब्रिटिशांची झोप उडवणारे बॉंबहूनही हाहाकार करणारे शब्द लिहिणारे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची उदाहरणं देशोदशींच्या इतिहासात अजरामर झाली आहेत. त्यासाठी संसाराची राख कपाळाला लावून बाहेर पडलेली ही माणसं!

पण हे तेज, हे सामर्थ्य साऱ्यांना पेलवेल? शब्दाची ताकद जोखलेल्या या कवितेच्या पोटी हीच तर आशंका आहे. ती ओळखते, की एका क्षणात रक्ताची नाती आणि जन्माचे मैत्र तुटून जावे, अशी ताकद या शब्दांत आहे! सामान्य आयुष्यात, व्यवहारात कितीदा तरी अनुभवलेले हे प्रसंग! म्हणून तर या शब्दांची मनात कुठंतरी धास्ती आहे! सावरलं नाही तर शब्द भलतंच बोलून बसतात. ओठांवरून वेळीच माघारी बोलावलं नाही तर आरपार निघून जातात! शब्द चिरतरुण असतो... शब्दाचे काहीच बिघडत नसते, बिघडत असते ते एकमेकांना धरून धरून जगण्याचा, तोल सांभाळत राहिलेल्या तुमचं-आमचं!
"दहा हजार गाई' या दि. बा. मोकाशींच्या कथेची आठवण होते. रिटायरमेंटला काहीच दिवस उरलेले आणि पैशांची गरज असलेला एक म्हातारा. त्याचे वरिष्ठ त्याला सतत टोचून बोलतात! त्यांना उलट सुनावण्याचं सतत मनात येतं त्याच्या, पण होतं असं, की काही बोलायला जावं, त्याच वेळी खिडकीतून एक चेहरा त्याला दिसतो. कुणाचा कुणास ठाऊक; पण त्याच्या शांत काळ्याभोर डोळ्यांत पाहताना राग थिजून जातो- ओठांवरचा बंडाचा शब्द मागे फिरतो! दर वेळेस असं होतं आणि अखेर म्हातारा "यशस्वीपणे' रिटायर होतो! त्याला हव्या असलेल्या दहा हजार गाई (रुपये) त्याच्या पदरी पडतात. मला वाटतं, हा चेहरा संयमाचा! अस्मितेच्या खाली पोट असतं, ते सांगणाऱ्या सर्वसामान्यांना झेपणाऱ्या शहाणपणाचा! असामान्यांचे शब्द सामान्य ओठांना पेलावेत कसे? कितीही खरं असलं तरी जगण्याच्या चौकटीत मावावेत कसे? म्हणून तर मग शब्द "सावरले' जातात. "माघारी बोलावले' जातात. तारुण्याच्या अस्मितेत स्वैर वाहणारे शब्द पोटाच्या किनाऱ्याला लागतात, तेव्हा वेगळेच बोलू लागतात.
साऱ्याच स्वतंत्र विचाराच्या विचारवंतांना, शास्त्रज्ञांना, प्रतिभावंतांना, कलाकारांनाही हे पोट काही चुकले नाही; मग सामान्य माणसाविषयी तक्रार ती काय? आता यातून कोण कशी वाट काढतं, हा ज्याच्या-त्याच्या वकुबाचा प्रश्‍न. कुणी झगडतं, उद्‌ध्वस्त होतं, कुणी वेगळी वाट काढतं, कुणी "मध्यम मार्ग' निवडतं, तर कुणी "धोपटमार्गी' शरण जातं! मिर्झा गालिबच्या ज्वलंत गझलांमध्ये कधीतरी मधूनच बादशहाची मर्जी राखण्यासाठी खास त्याच्या स्तुतीपर एखादा शेर येतो, एखादा कसिदा लिहिला जातो आणि मग या आणि अशा अनेक प्रतिभावंतांचा रसिक म्हणून आपल्याला रागही येतो आणि माणूस म्हणून कुठंतरी वाईटही वाटतं! ही नियतिशरणता, की हे जगण्याचं तत्त्वज्ञान? ही अपरिहार्यता की अगतिकता? ग. दि. माडगूळकरांचं एक गीत आहे- "गीत हवे का गीत?'.. मला तर त्या शीर्षकापासून कवितेतही या वस्तुस्थितीचाच कडवट उपरोध जाणवतो! मग मनात असूनही मनातला शब्द काही बाहेर फुटत नाही. शब्दांचे बाण प्रत्यंचेवर चढण्याआधीच भात्यात परत जातात! ही शोकान्तिका म्हणावी की एका अर्थानं जगण्याची समतोलता? नियतीनं माणसाला अस्मिताही दिली, पोटही दिलं. अगदी सहज वापरता येतील असे हजारो शब्द दिले आणि प्रत्येकामागं लावून दिली जगण्याची एक अखंड तारांबळ! या विनोदाची जात कुठली?

म्हणूनच तर निदा फाजलींसारखा प्रतिभावंत शायर विषादाच्या कुण्या एका क्षणी लिहून गेला असेल...
"मीर-ओ-गालिब के शेरों ने किस का दिल बहलाया है?
सस्ते गीतों को लिख लिखकर हमने घर बनवाया है।'