तू कुठे आहेस गालिब? (संदीप खरे)

गालिब कधी भेटला आठवत नाही. भेटल्यावरती लगेच कळला, पटला, भावला असं मुळीच नाही. त्याच्या समुद्रातला थेंबभरही तो कळला असं अजूनही वाटत नाही. पण पूर्वपुण्याईनं म्हणा तो कधीतरी कुणाकडून तरी ऐकला, कुठंतरी वाचला. शनिवारात जन्म घेतलेल्या माझी त्याच्याशी ओळख व्हावी, हे माझं भाग्य! त्यापूर्वी "अंधारात दिवा लगाओ वरना, धाडकन जिन्यावर पडोगे, गालिब' असल्या चहाटळपणात हा "गालिब' साथ द्यायचा. काहीही शायरी वगैरे असली की गालिब असतो एवढं ठाऊक होतं. "हनिमून एक्‍स्प्रेस' नावाच्या चित्रपटात शायरीशी अजिबात अनोळखी असलेल्या (आणि तरीही असलेच चहाटळ शेर जुळवणाऱ्या) बोम्मन इराणीला शबाना आझमी शेवटी हसून सांगते- "सभी शेर गालिब के नही होते।' आणि वर त्या गालिब या नावाचा खास नुक्ता असलेल्या "ग़ालिब' असा उच्चारही शिकवते! "ग़ालिब' हा उच्चारही अस्खलित करणं मराठी कंठाला थोडं कठीणच! पण टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाइट जमान्यात कुठल्यातरी कार्यक्रमात "ग़ालिब'ची शायरी आणि त्यावरची चर्चा, निरूपण असंच कुठल्यातरी उर्दू शायरातोंडून तिसरी-चौथीत असताना ऐकली. मुळात उर्दू भाषाच कानाला गोड गुंगी आणणारी! कोणी छान उर्दू बोलायला लागलं की वाटतं "राहू द्या हो तो अर्थ वगैरे बाजूला... आधी तासभर नुसतं बोलत राहा काहीतरी!' सांगायचा मुद्दा, की त्या कार्यक्रमात त्या वयातही मनात "गालिब' नावाची शम्मा थोडी रोशन झाली! आणि मग तो पुढे कुठं न कुठं भेटत राहिला. लेखांतून, पुस्तकांतून (अगदी चित्रपटातील गाण्यातूनही)! पुढे गुलजारांची "ग़ालिब' सिरीयलही भेटली! एक दिवस तर त्याचा "दिवान' (शायरीचा संग्रह) हाती आला. शब्दांचे अर्थ लावून वाचता वाचता जाणवू लागलं, की "हजारो ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पें दम निकले' असं लिहिणारं हे प्रकरण एव्हरेस्टपेक्षा उंच आणि पॅसिफिकपेक्षा गहिरं आहे! हा जन्मच नाही, पुढचे सगळे जन्म पुरून उरणारं आहे!

आपल्या प्रदीर्घ आयुष्यात जीवनाचे सगळे गदारोळ बघितलेला हा शायर. नाना अडचणी, संकटं, कौटुंबिक कलह, स्वत:च्या 7 अपत्यांचे मृत्यू, समकालीन शायरांसोबतचे कलह, शेवटची घरघर लागलेल्या मुगल खानदानाची राजकारणं, कर्जबाजारीपणा, जुगार आणि त्यापायी घडलेली तुरुंगयात्रा, मद्याचं अनिवार आकर्षण.. एक ना दोन! "ग़ालिब'चं सगळं चरित्र म्हणजे दु:ख आणि वेदनांची होरपळ आहे! आणि तरीही रोज मद्याचा पेला शेजारी ठेवून "मुश्‍किलें मुझ पर पडी इतनी के आसॉं हो गयी।' असं म्हणणारी असामान्य, लखलखती प्रतिभा। मिर्झाजींची लिखाणाची पद्धतही आगळीच! रोज रात्री मदिरेसोबत शायरी चालू असताना एक शेर सुचला, की साहेब हातातल्या रुमालाला एक गाठ बांधायचे. रात्रभर रुमालाला अशा गाठी पडत राहायच्या. आणि दुसऱ्या दिवशी एकेक गाठ सोडवून त्या-त्या गाठीसाठी लिहिलेला शेर कागदावर उतरवला जाई! आयुष्याच्या शेवटी "अजीजों अब तो बस अल्लाह ही अल्लाह है' असं म्हणेस्तोवर त्याला सोडून न गेलेली जगातली एकमेव गोष्ट म्हणजे त्याची शायरी आणि शेवटपर्यंत धडधाकट राहिलेलं त्याचं संवेदनशील मन! दु:ख, प्रेम, विरह, खुदा, आस्तिकता, नास्तिकता, सभोवतालची सामाजिक, राजकीय स्थित्यंतरं, पडझड या साऱ्यांची दखल घेणारं.. शेवटपर्यंत विनोद करू शकणारं, कळवळणारं, उसळणारं, रागावणारं, लोभावणारं "जिवंत' मन! आयुष्याला सर्वांगानं कवळू पाहणारं अति हळवं मन!

"सौमित्र'ची ही कविता वाचल्यावर "ग़ालिब' आणि हे संदर्भ कसे झळकून उठले! आठवतं, की कार्यक्रमासाठी दिल्लीला गेलो, तेव्हा बाकी कुठे जाण्याआधी जुन्या दिल्लीमध्ये "बल्कीमारान की पेचीदा सी गलियोंमे' "ग़ालिब'चं घर शोधत गेलो होतो! घराचा "नक्‍शा' काही आता थेट पूर्वीसारखा नाही; पण वास्तू तीच! शांत बसून तिथे "ग़ालिब'चं वावरणं डोळ्यासमोर आणत राहिलो!

तुलना नाही; होऊ शकतच नाही- पण वाटलं, की कसे आपण! छोट्या-मोठ्या दु:खांनी, संकटांनी हेलावून, गदगदून जाणारे चिमुकले "कवि'! जाणवलं, की "ग़ालिब'सारखं अतिसंवेदनशील मन तोलायचं तर त्याला "ग़ालिब'सारखेच जीवनेच्छेचे भक्कम हात हवेत! आयुष्याशी लढायची पोलादी छाती हवी! "घरात पाणी गेलं, लाइट गेले, दाढ दुखत्येय' यापेक्षा जास्त मजबूत कारणं हवीत खुदाशी भांडण्यासाठी! "सौमित्र'च्या शब्दात सांगायचं तर दु:खावर लिहायचं तर आधी "दु:खाइतकं मोठं व्हायला हवं'!

आयुष्याच्या अनेक अंगावर आज आत्यंतिक "कोरडेपण' अंगावर येत असताना "ग़ालिब' अजूनच अस्वस्थ करून सोडतो! हा कोरडेपणा जाणिवांचा, संवेदनांचा, आपल्या घरट्यापुरतं सुखदु:ख मानणाऱ्या संकुचितपणाचा! जगण्याची नाना दु:खं मानगुटीला घेऊन शेवटपर्यंत "सजीवपणे' झगडणाऱ्या, शायरीचा हात धरलेल्या "ग़ालिब'ची आठवण झाली. "कोहिनूर' हिऱ्यासारखा त्याचा एकेक शेर समोर आला, की संवेदना बोथट झालेला, पटकन तलवार टाकून देणारा आमचा "कवीपणा' ओशाळू लागतो! आणि "कवीपणा'च का? आख्खा "माणूसपणा'च ओशाळून जातो! शेवटी संवेदनशीलता ही काय फक्त कलाकाराचीच मक्तेदारी असते!

गालिबच्या घरात टेकून बसलो होतो, तेव्हा चार ओळी सुचल्या होत्या-

चालले होते बरे, होती मजा देवा तुझी
काय ही ग़ालिब होण्याची अशी इच्छा तुझी?
बघ तुझ्या शब्दांतले हे दु:ख आहे ओळखीचे
बाकी ही शैली तुझी! उपमा तुझ्या! भाषा तुझी!!

इतकंच सुचलं.. पुढे आजतागायत काही सुचलंच नाही.. कधी सुचेल ठाऊक नाही... गझल अर्धीच राहिल्येय अजून- तू कुठे आहेस "ग़ालिब'?

----------------------------------
गालिब!
मला काहीतरी झालंय्‌...
समुद्र पाहून
काहीतरी व्हायचं माझ्या छातीत...
शहरातल्या गर्दीत उगाच फिरतानाही
दिशाहीन वाटायचं मला...
संध्याकाळी सैरभैर व्हायचं तळं मनाचं...
पण आता,
साधे तरंगही उठत नाहीत त्यावर.
ऋतू बदलताना उदास हलायचं माझ्यातलं झाड...
आता,
झाडावरल्या पक्ष्यांनाही कळत नाही झाडाचं हलणं...
रात्री बेरात्री ऊर उगाच भरून यायचा...
आता,
नीरव शांतता पांघरून
डोळ्यांच्या बाहुल्या टक्क जाग्या असतात,
अंधार पुसत राहतात,
इकडून तिकडे
तिकडून इकडे.
एवढंच काय गालिब!
कविता लिहून झाल्यावर
साधा कागद जरी पाहिला
की चक्क दिसायचं रे झुळझुळताना पाणी...
आता,
कोरड्या पात्रातून चालत पोहोचतो मी
समोरच्यापर्यंत.
एकमेकांची तहान पाहात कसं जगायचं असतं
हे एकदा तरी सांग गालिब!
आता मला तुझ्या वेदनांवर
माझ्या जखमांची मेणबत्ती पेटवू दे...
माझं बोट धरून
घेऊन चल मला कवितेच्या जंगलात पडणारा
पाऊस पाहायला...
तुझ्या गझलांची हरणं
माझ्या डोळ्यांतून मनापर्यंत
उधाण खेळायला सोड...
मधली कोरडी जमीन
शिंगांनी उकरून काढायला सांग त्यांना मात्र...
गालिब!
मला दु:खाइतकं मोठं व्हायचंय्‌...
भोवतालच्या अंधाराला वणवा नाही लागला तरी चालेल
माझ्या शब्दांचे दिवे तरंगताहेत त्यावर
एवढंच मला पाहायचंय...
माझ्या जिवावर पडत चाल्लेल्या
आत्महत्यांच्या गाठी पार करत करत...
मला मरेपर्यंत जगायचंय्‌...
तुझ्यासारखंच...!
मी तुला कधीचा शोधतो आहे
तू कुठे आहेस गालिब?

नव्या शरीरातून
तू कदाचित ऐकतही असशील तुझंच गाणं...
तुझ्याच दु:खाची
तुला कदाचित ओळख नसेल राहिली...
"खुदा ऐसे एहसास का नाम है
रहे सामने और दिखाई ना दे...'
तसा
तू मला भेटतही असशील रोज...
कदाचित,
मी बारमध्ये दारू पिताना
प्रत्येक वेळी माझ्यासमोर झिंगून बसलेला
तूच असशील कदाचित...
कदाचित तू स्वत:च
दारू होऊन रोज पोटात जात असशील माझ्या...

गालिब!
कुणीतरी तुझा शेर ऐकवला
आणि माझ्या तोडून "व्वा' निघालीच नाही...
मी इतका कोरडा होण्याआधी भेट...
अन्‌ भेटल्यावर
नेहमीप्रमाणे माझ्याकडे उधार माग...
मी तुला काहीच देऊ शकणार नाही
म्हणजे मी किती कोरडा झालोय्‌
याची तुला कल्पना येईल...
आता
तू माझा आधार व्हायचंस
मी तुझा नाही...
आणखी कितीतरी शतकं पुरेल
एवढा झंझावात तू ठेवून गेलायस या जगात...
त्यातली फक्त एक झुळूक पुरेल मला
हे संपूर्ण आयुष्य जगायला...

मी तुला कधीचा शोधतोय्‌
तू कुठे आहेस गालिब?

----------------------------------
तू कुठे आहेस गालिब
कवी - सौमित्र
काव्यसंग्रह : ... आणि तरीही मी!, पॉप्युलर प्रकाशन