महिपतराव by Ranga Godbole

झालं काय की महिपतराव काही लोकांबरोबर त्यांच्या शिकार बंगल्यावर गेले होते. महिपतराव म्हणजे जंक्शन माणूस. अवघ्या पंचक्रोशीत रंगेल म्हणून प्रसिद्ध. अर्थात तसं त्यांच्या तोंडावर कुणी म्हणायचं नाही. त्याऐवजी जरा सन्मानानं - "रसिकाग्रणी" असा त्यांचा वृत्तपत्रात उल्लेख व्हायचा. त्यात लोककला म्हटलं की महिपतरावांची रसिकता अशी ओथंबून वहात असे, जणू तोंडातून पानाचा मुखरस वहावा. उभ्या महाराष्ट्रात अशी एकही लावण्यवती लावणी नर्तिका नव्हती जिच्या घुंगराचा आवाज महिपतरावांच्या शिकारबंगल्याच्या रंगमहालात घुमला नव्हता. महिपतराव साखर कारखान्याचे चेअरमन. झालंच तर जो पक्ष सत्तेवर असेल त्यात बेडूकउड्या मारण्यात तरबेज राजकारणी. साम, दाम, दंड , भेद वापरून स्वतःची पोळी भाजण्यात वाकबगार. मिठ्ठास वाणी, दिलदार स्वभाव, समोरच्याला खिशात टाकायची कला अवगत. पैसा आणि पॉवर- दोन्ही मजबूत. कशाची कमी नाही आणि वयही फार नाही. साठीच्या आसपास. पण महिपतराव स्वतःला तरुण ठेवण्याची सतत काळजी घ्यायचे. सुकामेव्याचा खुराक, पिकणाऱ्या चुकार केसांना नियमित कलप आणि अधूनमधून मुंबईला फाइवस्टार फ़ेशिअल असा त्यांचा 'मेंटेनन्स' असायचा. पिकल्या पानाचा देठ हिरवाजर्द होता. "विशीतल्या जवानाला लाजवेल अशी आमच्या महिपतरावांची तब्येत आहे", असं सनी म्हणायची.

आता ही सनी कोण?

तर "झक्कड नवरा फक्कड बायको" ह्या सिनेमाची नायिका. मूळ नाव तमन्ना पण महिपतरावांना एका नाजुक क्षणी तिच्यात सनी लिओनचा भास झाला आणि लगेच त्यांनी तिच्या कानात कुर्र्र म्हणून विसाव्या वर्षी तिचं नवं बारसं केलं. सनीचा हा सिनेमा कधी पडद्यावर आलाच नाही कारण निर्माते स्वतः महिपतराव होते. आपल्या लाडक्या सनीला पडद्यावर पाहून लोक शिट्ट्या वाजवतील ही कल्पनाच त्यांना सहन होईना. विशेषतः त्या सिनेमामध्ये सनीचा "आली दुधाची गाडी" ह्या आयटेम सॉंगवरचा नृत्याविष्कार बघून तिच्याविषयी लोकांच्या मनात वाईट विचार येतील अशी तर त्यांची खात्रीच पटली. शेवटी त्यांनी पिक्चर डब्यात घालायचा निर्णय घेतला आणि सनीची शिकारबंगल्यावर कायमची नियुक्ती झाली. आता फक्त महिपतराव आणि त्यांच्या खास पाहुण्यांकरता सनीचा "आली दुधाची गाडी" चा नृत्याविष्कार बंगल्यावर होऊ लागला.

तर असेच मागल्या आठवड्यात . . .

महिपतराव आणि त्यांचे खास पाहुणे शिकारबंगल्यावर गेले होते. खरं तर महिपतरावांना जरा बरं वाटत नव्हतं परंतु त्यांना जावं लागलं कारण जिल्ह्यातल्या एका तरुण तडफदार नेत्याची त्यांना खातिरदारी करायची होती. त्यांना खात्रीशीर टिप होती की हा नेता लवकरच कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त होणार होता. त्या मंत्रीपदावर आपली स्वतःची वर्णी लागावी म्हणून खुद्द महिपतराव खूप धडपडत होते. त्यामुळे ह्या नेत्याबद्दल त्यांच्या मनात खूप असूया होती. पण राजकारणात खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. त्यात महिपतरावांची तर कवळी होती. वेळ येईल तेव्हा ह्याचा पत्ता कापू पण आत्ता ह्याला खिशात टाकू ह्या विचारातून महिपतराव त्याच्याशी फाजील सलगी दाखवत होते. शिकारबंगल्यावर खास पार्टी अरेंज करण्यात आली होती. गाड्यांचा ताफा धूळ उडवत शिकारबंगल्यावर पोहोचला. सूर्य अस्ताला गेल्यावर पार्टी सुरू झाली. चषक भरले गेले. तरुण नेते तर महिपतरावांच्या दसपट रंगेल निघाले. त्यांनी उमरावासारखा पेहराव धारण केला होता. भरदार शरीर, पिळदार स्नायू आणि रुबाबदार व्यक्तिमत्व. एखाद्या परीकथेतल्या राजपुत्रासारखे दिसत होते ते. त्यांच्याकडे पाहून महिपतरावांना क्षणभर आपल्या उतारवयाची जाणीव झाली. त्यांनी ही भावना अंगावर पडलेल्या पालीला झटकावी तशी झटकली खरी पण ती गेली नाहीच. उलट . . .

जशी रात्र चढत गेली तशी ह्या पालीची मगर झाली कारण सनी!

"आली दुधाची गाडी" हे नृत्य सनीने सादर केलं आणि तिची मादक अदा पाहून तरुण नेते चेकाळले. आता किमान सनीनं तरी जरा घरंदाजपणा दाखवायचा. पण त्या जवान पुरुषावर तीही भाळली. तिनं महिपतरावांकडे चक्क दुर्लक्ष केलं आणि ती पाहुण्याला रिझवू लागली. हे सारं पाहून महिपतरावांचा पारा चढायला लागला. रागाच्या भरात ते पेगवर पेग रिचवू लागले. त्यांच्या छातीत धडधडू लागलं , हातापायाला कंप सुटला, अंगाला घाम फुटला. ते बैठकीतून उठले आणि आपल्या शयनगृहात गेले आणि त्यांनी बिछान्यावर अंग टाकलं . किती वेळ गेला कोण जाणे. त्यांना जाग आली तर त्यांच्या बिछान्याच्या दोन्ही बाजूला दोन अक्राळविक्राळ साडेसहा फुटी पुरुष उभे होते. मागे एकदा पंतप्रधानांचे सिक्युरिटीवाले महिपतरावांनी पाहिले होते. म्हणजे . . . .स्वतः पी. एम. आपल्या बंगल्यावर? महिपतराव धाडकन उठून बसणार तोच त्या दोघांनी त्यांना बिछान्यावर दाबून झोपवलं . हे काय चाललंय हेच महिपतरावांना समजेना.

बाहेर रंगमहालात नाचगाणं चालू होतं . सनीचा आणि तरुण नेत्याचा हसण्याखिदळण्याचा आवाज येत होता. महिपतरावांना हळूहळू सगळं आठवू लागलं. त्यांचा वाढलेला पारा, छातीतली धडधड, घाम . . . . पण आता त्यातलं काहीच नव्हतं. सारं कसं शांत शांत. महिपतरावांनी मनगटावर बोट ठेवलं. नाडी मंद … इतकी की नसल्यात जमा. महिपराव भांबावले. ते मानेवरची शीर चाचपू लागले, हृदयाच्या धडधडीचा कानोसा घेऊ लागले पण कुठेच काही सापडेना. त्यांची ही गत पाहून दोन दैत्यांपैकी एक स्मितहास्य करून म्हणाला -

"दोन पाच मिनिटांचा प्रश्न आहे. संपेल सगळं. की मग निघू आपण."

"निघूया? कुठे?"- महिपतराव न समजून म्हणाले.

"नरकात. . .तुम्ही आणखी दुसरीकडे कुठे जाणार? आम्ही रेड्याची वाट पहातोय. एकाला drop करायला गेलाय. तो आला की लगेच निघू" दुसरा दैत्य म्हणाला.

नरक? रेडा?. . . . . हळूहळू महिपतरावांच्या डोक्यात प्रकाश पडायला लागला. म्हणजे हे दोन दैत्य पंतप्रधानांचे सिक्युरिटीवाले नाहीत, यमदूत आहेत हे त्यांना लक्षात आलं. एखादा असता तर त्याची गाळण उडाली असती पण महिपतराव मुरब्बी राजकारणी. आत्तापर्यंत त्यांनी अनेक गंभीर संकटातून स्वतःची सुटका करून घेतली होती. एकदा तर एका खून प्रकरणात त्यांना फासावर जाण्याची पाळी आली होती पण त्यांनी सेटिंग करून स्वतःला सोडवून घेतलं होतं. आत्ताही सेटिंग करणं आवश्यक होतं. त्यांनी मंद स्मितहास्य करून पहिल्या यमदूताबरोबर संवाद साधायला सुरुवात केली.

"तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. कुठले तुम्ही?"

"नरकातले"

"अहो ते नाय हो. मूळ गाव कंच?"

यमदूत हरखला. मेल्यानंतरच्या उभ्या आयुष्यात त्याला हा प्रश्न कुणी विचारला नव्हता. त्यानं हळूच उत्तर दिलं.

"मांडव खुडकुद्री"

महिपतरावांची मेंदूची चक्रे गरागरा फिरू लागली. त्याचं सर्च इंजिन थांबलं आणि ते म्हणाले-

"मांडव खुडकुद्री" म्हणजे गडहिंग्लजच्या पल्याड हाय त्ये?"

"व्हय" यमदूत चमकून म्हणाला.

बाण लागला तशी महिपतराव खूष झाले. आता ओळख काढायला हवी.

"अरं म्हनजे आमच्या अप्पा झेंगटयाचं गाव. झेंगटे पाटील म्हाईत हाय नव्हं?"

"व्हय तर"

"आन्गाशा. तू तर आपल्या घष्टन मधला निघाला. अप्पा म्हंजी माज्या बायकोच्या मामेभावाच्या आत्येभावाचा चुलत साडू.'

'काय सांगताय?"

"तर? अप्पा म्हंजी देवमाणूस"

हे ऐकून यमदूत हसला.

"देवमाणूस? नरकातबी जागा भेटत नव्हती अप्प्याला इतका खराब माणूस."

"म्हंजी अप्पा म्येला?"

"मीच उडवला त्याला. गावाला छळ सहन होईना झाला व्हता त्याचा. कुनाची जमीन खाल्ली, कुनाची पोर नासवली. पापाचा घडा भरला व्हता त्याचा. माझ्या बायकोवर हात टाकला त्यानं. माझं टक्कुरं सरकलं. भोसकून मर्डर केला. मंग काय. . मीबी नरकात आलो. पण चित्रगुप्त साहेबांनी माझी केस यमसाहेबांना सांगितली. ते म्हणाले त्या अप्पाला मारलंस हे तू चांगलं केलंस. तू नरकातच रहाशील पण माझ्या स्टाफमधे"

अप्पाची सोयरीक सांगून आपण चूक केली हे महिपतरावांच्या लक्षात येताच त्यांनी बेडूकउडी मारली.

"वा वा वा . फार चांगलं काम केलंत पाव्हणं. अहो आमच्याबी अस्तनीतला निखारा झाला व्हता. खरं म्हंजी तुमचा पुतळा उभारला पायजेल मांडव खुडकुद्रीच्या बाजारात".

हे ऐकून यमदूत खिन्न झाला.

"अहो कसला पुतळा? आधी सगळ्यांनी वाहवा केली पण नंतर काळ्या कुत्र्यानंबी ढुंकून इच्यारलं न्हाई. बायकापोरं हालात दिस काढत्यातेत. कोन इच्चारना त्यानला"

"अरं म्या हाय की. जिल्हा परिषदेत आपला वट हाय. शी एम आपला दोस्त हाय. अरं तुझा पुतळा उभारू . तुझ्या नावाचा एक झकास पुरस्कार चालू करू. नाव काय तुझं?"

"नाव नाय आता. यमदूत बक्कल नंबर ३४ म्हंत्यात मला"

"अरं तुझं हितलं - खाल्ल्या जगातलं नाव काय व्हतं?"

"बबडू दगडू पाणघोडे"

"ठरलं तर मग. बबडू दगडू पाणघोडे धैर्य पुरस्कार चालू करू. दिल्लीमध्ये भव्य सोहळा. पी एम च्या हस्ते. तुमच्या बायका पोरान्ला विमानानं दिल्लीची सफर. त्यांचाबी सत्कार, शाल, २१ लाख रुपये आन शिवाय मुंबईत म्हाडाची सदनिका"

"सदनिका? त्ये काय असतं?"

"म्हंजी सोत्ताचं घर- त्येबी मुंबईला "

आता मात्र यमदूत विचारात पडला. ही ऑफर अशी होती की कोणीही मोहात पडला असता.

"पण भाऊ आता हे कसं जमायचं. तुमची तर नरकात जमा व्हायची वेळ आली. तुम्हाला तर उचलावं लागणारंच. ही काय ऑर्डर बी हाय तुमच्या नावाची".

"असं? बगू"

यमाची ऑर्डर हातात घेऊन वाचणारे महिपतराव हे पहिलेच "मर्त्य मानव". ते हसून म्हणाले-

"अरं बबडू सोप्पं हाये. माझ्या ऐवजी बदली माणूस द्येतो. ऑर्डरवरचं माझं नाव खोड अन त्याचं नाव टाक"

"पन ही खाडाखोड फेरफार कुनाच्या ध्यानात आले तर? तिकडंबी नोंदणी करायची शिष्टम हाय "

"अरं बबडू शिष्टीम आली की सेटिंग आलंच. अरं सात बाराच्या नोंदणीमधले फेरफार करन्यात जिंदगी घालीवली आम्ही. ह्ये तर एकदम सोप्पं हाय. आन हे बग- मी तुला बदली उमेदवार देतो शिवाय वर फ्रीमदी एक गिफ्ट देतो"

"नरकात कसली आलीया गिफ्ट? काय उपयोग न्हाय"

"आरं बबडू ही साधीसुधी गिफ्ट न्हाई. मला सांग स्वर्गामधी एक से बढकर एक नर्तकी आहेत. रंभा, मेनका, उर्वशी. तुमच्याकडं नरकात कोन हाय?"

"एकबी न्हाय" यमदूत खेदानं म्हणाला.

"ह्यो म्हंजी सांस्कृतिक अनुशेष झाला. त्यो भरून काडायलाच पायजेल. बास्स, दिली तुम्हाला एक नर्तकी दिली. आता तुमी फकस्त सेटिंग करा की झेंगट जमलं"

महिपतराव गडगडाट करून हसले आणि त्यांनी यमदूताला टाळी दिली आणि त्यानंही हसून ती घेतली. दुसरे दिवशी बातमी आली -

" एका विचित्र अपघातात तरुण तडफदार नेत्याचा मृत्यू. इथल्या साखर कारखान्याचे चेअरमन "रसिकाग्रणी" महिपतराव ह्यांच्या शिकार बंगल्यावर एक सांस्कृतिक कार्यक्रम आटपून परतताना एका दुधाच्या गाडीवर आपटून हा अपघात झाला. योगायोग म्हणजे त्यांच्यासोबत "आली दुधाची गाडी" फेम नर्तिका सनी हीसुद्धा होती. तिचाही ह्या अपघातात अंत झाला".

ब्रेकफास्ट टेबलवर बसलेल्या महिपतरावांनी एक जांभई दिली आणि ते ओरडले -

"कुनी हाय का? आंघोळीच्या पाण्याचं सेटिंग करा".

(समाप्त)