माझे नसून...माझे !

आरती प्रभू म्हणजे झपाटलेलं आणि झपाटून टाकणारं नाव...मला तर त्यांनी फार पूर्वीच खिशात टाकून दिलं! कितीदा आणि कशी जाणवते त्यांची कविता...जरा हातात येते न येते तोच उदबत्तीच्या धुरासारखी बोटातून विरून जाते. चांदण्यारात्री झाडांच्या काळ्याशार सावल्या जमिनीवर हलत राहाव्यात, तसं गूढ काही जाणवत राहतं...वय वाढतं, मूड बदलतात, कडू-गोड अनुभवांचं संचित वाढतं आणि मग आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तीच कविता काही तरी वेगवेगळं सांगू जाते...! काल जाणवलेलं खरं की आज जाणवलेलं? की दोन्ही खरं...? जाऊ दे...कवितेचं; त्यातून आरती प्रभूंच्या कवितेचं हे गूढ काही उकलायचं नाही! "माणुस म्हणजे' ही त्यांची वाचताक्षणी काळजात कायमची वस्तीला आलेली माझी लाडकी कविता. गेली कित्येक वर्षं मी ती वाचतोच आहे. त्या कवितेचं बोट धरून मी माझ्या बालपणात जातो...शिरवली नावाचं माझं छोटं गाव आहे, त्यात पोचतो!

केवढा कल्लोळ असतो ना त्या डोक्‍यात त्या वयामध्ये! काही समजत असतं. काही आवाक्‍यात नसतं...जाणीव...संवेदना...अज्ञान...सभोवतालचं जग, त्यातले व्यवहार...पहिल्याच दोन ओळींमध्ये या प्रश्‍नांचं केवढं आकाश मांडून ठेवलं आहे, या कवितेनं! रक्त भळभळत वाहतं तो माणूस? एवढीच व्याख्या? नाही...काही अजून असणार! आणि मोसंबीची सालं रंगवण्याचा हा खटाटोप आणि पिवळी पडणारी ही पानं...हे सारं इतकं आवश्‍यक, अनिवार्य आहे? आणि यातली तर्कसंगती?

आणि खिडकीतून आत येणाऱ्या अगणित किरणांना सात गजांच्या सातांनी गुणण्याचा चाळासुद्धा किती चित्रदर्शी! मला तर डोळ्यांसमोर सकाळच्या सोनेरी उन्हात, ओटीवर गजांपाशी बसलेला, हरवून गेलेल्या डोळ्यांनी टकमक पाहत राहणारा एक छोटा मुलगा वारंवार दिसतो...वय असेल 8-9 वर्षांचं....आजोबांच्या कुशीत बसून गोष्ट ऐकण्याचं! मिश्‍किल, गमतीशीर गोष्टी सांगून हसवणारे..मध्येच गंभीर होऊन आढ्याकडं पाहत झोपाळ्यावर झुलणारे...कोटाच्या खिशातून हळूच चिमणीचा खोपा काढून दाखवणारे...आणि ते पाहताना वासलेला आऽऽ...

आणि असले हे आजोबा...गेलेच की हो एकदम! काल दिसत होते. बोलत होते. हसत होते. गोष्ट सांगत होते...आणि आज? गेलेच! बाकीचे म्हणतायत देवाकडं गेले. खुंटीवरती नेहमीच्या जागी कोट तेवढा राहिलाय...तो का ठेवून गेले? प्रश्‍न पडतातच आहेत... वय वाहतंच आहे...रात्र असू दे वा दिवस...डोळे मिटले की अंधारच! खडू मिळाला. तोही निळ्या रंगाचा...मग काय...गावाबाहेरचे दूर दिसणारे निळे डोंगर आले डोळ्यांसमोर. आवेशानं पाटीवरती निळा डोंगर उमटू लागला...सगळं ध्यान, मन एकवटून...नादात जीभ बाहेर काढून चित्र काढणं सुरू झालं. वाटलं, जमला...मला डोंगर आला..असेच बनतात डोंगर...अशाच घडतात सगळ्या वस्तू...हे जग! पण कसचं काय? पाटीवरच्या माझ्या डोंगरामागून सूर्य उगवलाच नाही. वय वाढलं...पण पाटीवरच्या डोंगराची ती निळी पुटं...तो तेव्हाचा हळवा आवेश...त्याच्या आठवणी तेवढ्या राहिल्या.

कसं वय होतं...कसं मन! ढग एखादा मोरपिसाऱ्यापरी डवरता...मोठ्ठा ढग यायचा घरावर...काहीतरी व्हायचं आतून. डोळ्यांत उलट्या-सुलट्या प्रश्‍नांचं काहूर...त्यातून दूर कुठून तरी वातावरणात विरघळलेली सनई...दाटून यायचं...डोळे कसे न रडून रडल्यासारखे...आणि आतून आतून दुखणारे...
कविता संपते तिथं समेला असं हुरहूर लावणारं काही तरी...सरळ, निरागस, बोलता-बोलता चटका लावणारी ही आरती प्रभूंची कविता! हा लेख म्हणजे त्या कवितेचा अर्थ मुळीच नाही...या केवळ माझ्या भावविश्‍वातल्या वर्दळी आहेत...! शेवटी, कवितेचा निश्‍चित असा अर्थ कोण सांगू शकला आहे! स्वतः कवीसुद्धा तो जाणू शकतो? कुठल्याही टप्प्यावर दर वेळी वेगळंच सांगणारी ही कविता...त्याविषयी बोलावसं वाटलं, इतकंच! तुम्हाला-मला पडणाऱ्या अनेक सनातन प्रश्‍नांची कैफियत आहे...ती छळते...झपाटते...म्हणूनच अशा चटका लावणाऱ्या कविता जन्म घेतात? वाचाव्याशा वाटतात? कुणास ठाऊक!...शेवटी काय तर, "दगड लागता रक्त भळभळे इतुके ठाउक...!!